नवी दिल्ली : भारताचे ऑलिम्पिक पदकविजेते हॉकीपटू बलबीर सिंग सीनिअर यांचं आज सकाळी पंजाबमधे मोहाली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. बलबीर यांनी तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या भारतीय हॉकी संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं वेळोवेळी निवडलेल्या भारतातल्या १६ सर्वोत्कृष्ट खेळांडुंपैकी ते एक होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बलबीर सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.