नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदत मिळत नसल्याचे आरोप बिनबुडाचे असून, गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारनं राज्याला विविध योजनांच्या माध्यमातून २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली असल्याचं, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र सरकारनं गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत ४ हजार ५९२ कोटी रुपयांचं अन्नधान्य, प्रधानमंत्री किसान सन्मान आणि जनधनसह विविध योजनांमधून थेट ३ हजार ८०० कोटी रुपये, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत १ हजार ६२५ कोटी रुपयांचे ७३ लाख १६ हजार गॅस सिलिंडर, श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी, तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १ हजार ६११ कोटी रुपये दिले असल्याचं, फडनवीस यांनी सांगितलं.
आरोग्य सेवेसाठी २ हजार ५९ कोटी रुपयांची मदत दिली असून, यामध्ये १० लाख पीपीई किट्स, १६ लाख एन 95 मास्क आणि ४४८ कोटी रुपये निधीचा समावेश असल्याची माहिती फडनवीस यांनी दिली.
शेतमाल खरेदीसाठी एकूण ९ हजार ६९ कोटी रुपये केंद्रानं राज्य सरकारला दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करांतर्गत आतापर्यंत मिळालेल्या करापैकी महाराष्ट्राच्या वाट्याच्या १ हजार १४८ कोटी रुपयांऐवजी कराच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंतच्या अग्रीम वाट्यासह ५ हजार ६४८ कोटी रुपये केंद्रानं महाराष्ट्र सरकारला दिले असल्या फडनवीस म्हणाले.
नोव्हेंबरनंतरच्या वाट्यासंदर्भात जीएसटी परिषद राज्यांसाठी अनुकूल निर्णय घेईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.