३० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

मुंबई : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी आज मंत्रालयात मदतीचा डिमांड  ड्राफ्ट सुपूर्द केला.  यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा, मुंबईचे उप महाव्यवस्थापक अशोक दास उपस्थित होते.

‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपये ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’साठी देण्यात आले आहेत.