दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ

मुंबई, दि. 15 : दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ आजपासून झाला असून हे अभियान 14 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या महिनाभरात या अभियानाअंतर्गत 33 लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि 40 लाख गॅस कनेक्शन मिळणार असल्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर,उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंगलप्रभात लोढा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या अभियानामुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येणार आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ‘धूरमुक्त महाराष्ट्र’ ही योजना जाहीर केली होती. केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील 8 कोटी महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली होती. आता दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानामुळे महाराष्ट्रातील 40 लाख कुटुंबाना धुरापासून मुक्ती मिळून गॅस कनेक्शन मिळणार आहे.

समाजातील शेवटचा घटक हा कोणत्याही योजनेचा केंद्रबिंदू असला पाहिजे असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे म्हणणे होते.  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना आखताना समाजाच्या शेवटच्या घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळेल याचा अभ्यास केला, याबद्दल मी विभागाचे कौतुक करतो. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने डिजिटायझेशनच्या माध्यमातून गैरव्यवहाराला आळा घालण्यात यश मिळविले आहे. चुकीचे लाभधारक शोधून काढून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्यामुळे वंचित लाभार्थ्यांपर्यंत विभागाला पोहोचता येणे शक्य झाले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री श्री. पाटील- निलंगेकर म्हणाले,  सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काम करीत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बदलामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मदत देता आली, तर नव्याने लाभार्थी जोडता आले. लोकांच्या दैनंदिन जीवनमानाशी संबंधित हा विभाग असल्याने सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बदल करण्यात आला. सार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करणे, सक्षम करणे याला प्राधान्य देत असताना सर्व यंत्रणेचे बळकटीकरण करणे याला प्राधान्य देण्यात आले आहे.

प्रातिनिधीक स्वरुपात आज सह्याद्री अतिथीगृह येथे 5 लाभार्थ्यांना शिधावाटप, गॅस कनेक्शन आणि धान्य वाटप करण्यात आले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाविषयी…

  • अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत  पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान 15 जुलै 2019 ते 14 ऑगस्ट 2019 या काळात राज्यभर राबविण्यात येणार आहे.
  • या अभियानाअंतर्गत पात्र कुटुंबांना 100 टक्के शिधापत्रिका वाटप,पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के धान्य वाटप आणि धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्व कुटुंबाना 100 टक्के गॅस कनेक्शन अशी या अभियानाची ३ उद्दिष्टे असणार आहेत.
  • अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात ही तिन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्याचा 100 टक्के प्रयत्न करण्यात येईल. या अभियानाची सुरुवात राज्यातील सर्व जिल्ह्यात झाली आहे.