नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ राजकीय नेते आणि छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित प्रमोदकुमार जोगी यांचं आज रायपूर इथल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ७४ वर्षांचे जोगी ९ मे पासून  रुग्णालयात उपचार घेत होते. मरवाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

नोव्हेंबर २००० मधे छत्तीसगड राज्य अस्तित्वात आलं तेव्हा जोगी मुख्यमंत्री झाले. 2003 मधे झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता गमावली तेव्हा ते पायउतार झाले. ४ वर्षांपूर्वी जून २०१६ मधे त्यांनी काँग्रेस सोडून जनता काँग्रेस हा वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. त्याला २०१८ च्या निवडणुकीत ५ जागा मिळाल्या.

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जोगी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गरीबांच्या विशेषतः आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जोगी यांनी आयुष्य वेचलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.