नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल; लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला.

संकट मोठं आहे, परंतु सर्वांनी एकत्र येऊन, संकल्प करून धीराने या संकटाला हरवायचं आहे. देशातल्या स्वयंसेवी संस्था; युवा पिढी इतकंच नाही तर लहान मुलांनाही कोरोना नियमांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करत टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असेल असं पंतप्रधानांनी काल स्पष्ट केलं. देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल देशावासियांशी संवाद साधला.

राज्यांनीही टाळेबंदीचा अगदी शेवटचा पर्याय म्हणून विचार करावा; आणि श्रमिक, मजुरांमध्ये विश्वास निर्माण करावा असं ते म्हणाले.

देशातल्या युवकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना नियमांबाबत जनजागृती करावी तसंच घरातून कोणीही मोठी व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही याकडे बालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं.

कोरोनाच्या या संकटामुळे जनतेनं जो त्रास भोगला त्यांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे; ज्यांनी आपले जीवाभावाचे लोक या जागतिक साथीमध्ये गमावले त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असं पंतप्रधान म्हणाले.

कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपल्या जीवांची पर्वा न करता काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले. कोरोना संकटाशी लढत असताना केल्या जात असलेल्या विविध पातळ्यांवरील कामांची माहिती पंतप्रधानांनी दिली.

ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जात आहेत; देशातल्या विविध रुग्णालयातील खाटा वाढवण्याचं नियोजन केलं जात आहे; आपल्या देशातल्या तज्ञ वैज्ञानिकांनी अत्यंत कमी कालावधीत कोरोना वरील लस तयार केली असून येत्या १ मे पासून १८ वर्षांच्या पुढच्या सर्वांना लस दिली जाणार आहे; असं मोदी म्हणाले.