नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक शांतता, जागतिक भरभराट किंवा जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, या कारणांमुळे सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षा आणि आत्मविश्वासानं बघत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात जीतो, अर्थात जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेतर्फे आयोजित जागतिक व्यापार परिषदेच्या उद्घाटन समारंभात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातनं संबोधीत करत होते.

काही बाबतीत जरी मतमतांतरे असली, तरी नवीन भारत सगळ्यांना एकमेकांशी जोडतो, असंही ते म्हणाले.  आपला देश जरी पूर्ण क्षमतेनं विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असला, तरी आत्मनिर्भर भारत हे आपलं प्राधान्य आणि लक्ष्य आहे, असंही मोदी म्हणाले. जेम, अर्थात गव्हर्मेंट इ मार्केट संकेतस्थळ जेव्हा पासून केंद्र सरकारनं सुरू केलं आहे, तेव्हा पासून सर्व व्यवहार एकाच व्यासपीठावर आल्यामुळे सगळ्या उद्योगपतींना सोयीचं झालं आहे. आता ग्रामीण भागातला छोटा व्यापारी देखील आपली उत्पादनं या व्यासपीठावर विकत आहे, असं मोदी म्हणाले. या परिषदेची टुगेदर टुवर्ड्स टुमॉरो ही संकल्पना खरोखरंच सबका साथ सबका प्रयास या केंद्र सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. पुढील तीन दिवस ही परिषद सुरू राहणार आहे.