नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एप्रिल महिन्यात कोळशाची मागणी मार्च महिन्याच्या तुलनेत २५ कोटी टनांहून अधिक वाढली. त्यामुळं देशात कोळशाची समस्या निर्माण झाल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
मुंबईत आयोजित गुंतवणूकदार परिषदेनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. येत्या काही वर्षात त्यातून ३ ते ४ कोटी टन कोळसा उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात पहिल्यांदाच कोळशाचं व्यावसायिक खाणकाम सुरू आहे. येत्या ६-७ महिन्यात देशात पुरेसा आणि १०-१२ महिन्यात गरजेपेक्षा अधिक कोळसा उपलब्ध होईल, असंही ते म्हणाले.
देशातल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये २ कोटी १५ लाख टनांहून अधिक कोळसा शिल्लक आहे. इतर ठिकाणी ७ कोटी ३० लाख टन कोळसा उपलब्ध आहे. दररोज २० लाख कोळसा प्रकल्पांना पाठवला जातो, असं ते म्हणाले. रेल्वे, ऊर्जा आणि कोळसा मंत्रालय एकत्रितरित्या काम करत असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.