मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वर्ष २०२१-२२ साठी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार यंदा दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला आहे. विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी  आतांबर शिरढोणकर यांना, तर  २०२०-२१ या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावे दिला जाणारा रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२०-२१ या वर्षासाठी दत्ता भगत यांना, तर २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार सतीश आळेकर यांना, जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार वर्ष २०२०-२१ साठी   लता शिलेदार ऊर्फ दिप्ती भोगले यांना, तर २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकुर यांना जाहीर झाला आहे. या पाचही पुरस्काराचं  स्वरुप ५ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं  आहे. सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ यासाठीचे हे पुरस्कारही आज जाहीर झाले. १ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. चित्रपट, नाटक, संगीत समीक्षकांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचं यावेळी अमित देशमुख यांनी सांगितलं.