नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन संपत असताना कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीचा अधिकच खबरदारी घेण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते देशवासियांशी संवाद साधत होते.
जागतिक परिप्रेक्ष्यात भारतानं या महामारीचा प्रभावीपणे मुकाबला केला असून भारतीयांची एकजूट, खंबीरपणा, आणि सेवाभावामुळेच शक्य झालं असल्याचं मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं.
भारतीयांच्या या वृत्तीप्रमाणेच आयुर्वेद आणि योगसाधनेबद्दल साऱ्या जगात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली आहे असं त्यांनी सांगितलं. आयुष मंत्रालयातर्फे येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय योग – ब्लॉग स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सलाम करुन लॉकडाऊन दरम्यान गरीबांना विशेषतः स्थलांतरित कामगारांना त्रास भोगावा लागल्याबद्दल तीव्र संवेदना त्यांनी व्यक्त केल्या.
या श्रमिकांना घरी पोचता यावं यासाठी काम करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या रेल्वे, अणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं कामही कोरोना योद्ध्यांइतकंच महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.
कोविड-१९ ची महामारी आणि लॉकडाऊनच्या काळातले धडे देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर पुढं जायला उपयुक्त ठरतील असं सांगून त्यांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणांचा उल्लेख केला.
सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने केलेल्या काही उपाययोजनांची माहिती मोदी यांनी दिली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त रुग्णांवर मोफत औषधोपचार झाले आहेत.
ज्याची किंमत १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या योजनेच्या ५०%हून जास्त लाभार्थी महिला आहेत. ८०% हून जास्त लाभार्थी ग्रामीण भागातले आहेत.
एकीकडे कोविड-१९ महामारीचा सामना करत असताना अंफन वादळाशी झुंजणाऱ्या पश्चिम बंगाल आणि ओदिशाचं तसंच टोळधाडीचा सामना करणाऱ्या राज्यांचं मोदी यांनी कौतुक केलं.
येत्या ५ जूनला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाची संकल्पना ‘जैवविविधता’ अशी असून लॉकडाऊन दरम्यान सारे व्यवहार थंडावले असताना आपण तिचा अनुभव घेतला असल्याचं निरीक्षण त्यानी नोंदवलं.
सद्भावना आणि सामंजस्याने जगण्याची प्रेरणा आपण निसर्गापासून घेतली पाहिजे असं ते म्हणाले.पर्यावरण दिनी प्रत्येकाने एक झाड लावावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.