नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हर्ड इम्युनिटी, अर्थात समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं हे  कुठल्याही देशाकरता मोठं आव्हान असून, केवळ वेळेवर उपचार करूनच कोविड १९ चा प्रसार रोखता येईल, असं  CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक शेखर मांडे यांनी म्हटलं आहे.

ते आज पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. जेव्हा देशाची जास्तीतजास्त लोकसंख्या  एखाद्या  संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन, अथवा लसीकरणाच्या मदतीनं त्या आजारामधून  बरी होते, तेव्हा जनतेमध्ये  सामूहिक प्रतिकारक्षमता विकसित होते.

मात्र अशा वेळी देशाची ६० ते ७० टक्के जनता त्या रोगानं बाधित होते, आणि केवळ रोगाचे वाहक कमी असल्यानं रोगाचं संक्रमण होत नाही. त्यामुळे  कुठल्याही देशाकरता ही गोष्ट जोखीमीची असून, रोगाचं संक्रमण होण्यापूर्वीच त्याला रोखणं अधिक योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोविड १९ ची लाट परत  येऊ शकते, हे जगभरात झालेल्या संशोधनामधून निश्चित झाल्यानं या आव्हानाला तोंड देण्यासाठी जनतेनं सज्ज राहायला हवं असं मांडे यांनी सांगितलं.