नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याची घोषणा आज केली. त्यानुसार राज्यभर ३० जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र आता लॉकडाऊन पूर्णपणे न उठवठा टप्प्याटप्प्याने उठवला जाणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना लॉकडाऊन पूर्वीप्रमाणे आयुष्य सुरू करायला मदत मिळेल.

राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या दिशानिर्देशानुसार संपूर्ण राज्यभरात, शाळा, महाविद्यालयं आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था बंदच राहणार आहेत. याशिवाय सिनेमा आणि नाट्यगृह, सभागृह, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा, तरण तलाव, पार्क, केस कापण्याची दुकानं, स्पा, सलून, ब्युटी पार्लरवर लागू असलेली बंदी कायम राहणार आहे.

यासोबतच राज्यात कुठेही मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच अशा प्रकारची सेवा देणारी इतर ठिकाणं आणि बारवरची बंदीही सध्यातरी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो रेल्वेची सेवा बंदच असेल.

मात्र हळूहळू या सेवा सुरू करण्यासाठीचे दिशानिर्देश प्रसिद्ध केले जातील, असा दिलासा राज्य सरकारने व्यक्त केला आहे.

आंतर जिल्हा बस वाहतूक सध्यातरी बंदच राहणार असून त्यासंदर्भात नंतर दिशानिर्देश प्रसिद्ध केले जातील. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ५० टक्के प्रवाशांसह बस सेवा चालवता येईल.

रेल्वेची प्रवासी वाहतूक आणि देशांतर्गत विमानसेवा त्या त्यावेळच्या आदेशाप्रमाणे आणि त्यासाठीच्या निर्धारित केलेल्या नियमावलीनुसारच सुरु राहील. याव्यतिरिक्त या सेवा बंदच राहतील असंही आज जारी झालेल्या नियमावलीत म्हटलं आहे. मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात सरकारनं काहीही स्पष्ट केलेलं नाही.

दरम्यान मुंबई महानगर क्षेत्रातल्या महापालिकांसह, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातले प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र याआधी लागू असलेले काही निर्बंध राज्यसरकारनं शिथील केले आहेत.

नव्या नियमावलीनुसार नागरिकांना, ३ जून पासून सकाळी ५ ते संध्याकाळी सात या वेळेत सायकलींग, जॉगींग, चालण्याचा व्यायाम याकरता केवळ आपल्या घराच्या जवळ असलेल्या मैदानं, समुद्र किनारे याठिकाणी जाता येणार आहे. याठिकाणी गटागटाने नव्हे तर एकट्याने जाता येईल.

लहान मुलं मोठ्या माणसांसह मैदानावर खेळायलाही जाऊ शकतील. मात्र नागरिकांनी जास्त वेळ घराबाहेर राहु नये, तसेच गर्दीची ठिकाणं टाळावीत, असा सल्लाही राज्य सरकारनं दिला आहे.

प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल आणि इतर तंत्रज्ञांना सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाहन दुरुस्तीच्या कामांसाठी आधी वेळ निश्चित करण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सरकारी कार्यालयांना १५ टक्के किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल ते इतक्या क्षमतेनं काम करायची परवानगी असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ५ जुनपासून मॉल्स आणि बंदी असलेल्या मोठ्या बाजारपेठा वगळता, इतर बाजारांची ठिकाणं सकाळी ९ ते ५ या वेळात सुरु करता येतील.

यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुंपैकी एक बाजू सम तारखेला तर दुसरी बाजू विषम तारखेला सुरु ठेवण्याची परवानगी असेल. कोणत्याही दुकानांमध्ये ट्रायल रुम आणि वस्तु परत किंवा बदली करण्याची सोय नसेल.

परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याची जबाबदारी संबंधित दुकानमालकांची असेल. यात अपयश आलं तर संबंधित यंत्रणेला अशी दुकानं बंद करण्याचा अधिकार असेल. अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंसाठी नागरिकांना लांबचा प्रवास करायची परवानगी असणार नाही.

या टप्प्यात वाहतुकीसाठी टॅक्सी, खाजगी कॅब आणि तत्सम वाहनं, रिक्शा आणि चारचाकी वाहनात चालकासह २ जणांना तर दुचाकीवरून केवळ चालकाला प्रवास करण्याची परवानगी राहील.

८ जुनपासून तिसऱ्या टप्प्यात खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष कार्यालयात १० टक्के क्षमतेसह काम सुरु करायला परवानगी असेल. मात्र सर्व कर्मचाऱ्यांना घरी परतल्यावर घ्यायच्या काळजीबाबत सविस्तर प्रशिक्षण देणं बंधनकारक असणार आहे.

राज्याच्या इतर भागात या सवलतींसह याआधी दिलेल्या सवलती कायम असणार आहेत. त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही.