नवी दिल्ली : केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा आज केली. याअंतर्गत फेरीवाऱ्यालांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. पानवाले, केशकर्तनालय चालविणारे, चपल दुरुस्तीचे दुकान चालविणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता. वर्षभरासाठी हे कर्ज दिले जाणार असून मासिक तत्त्वावर त्याची परतफेड करायची आहे. यावर ७ टक्के दराने व्याज आकारले जाणार असून वेळेवर कर्जफेड करण्यांनी भरलेले व्याज त्यांच्या बँक खात्यात परत केले जाईल. याशिवाय या फेरीवाल्यांना भविष्यात २० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे कर्जही मिळू शकेल.
नियमित बँकांशिवाय सहकारी बँका, लघू वित्त बँका, गैर बँकिंग वित्तीय संस्था वगैरेंमधूनही हे कर्ज मिळणार आहे. ५० लाख फेरीवाल्यांना याचा लाभ मिळू शकेल.