मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावेत, रुग्णालयातल्या खाटांचं व्यवस्थापन कराव, प्राणवायू पुरवठा, आणि औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावं. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबईतल्या कोरोना परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल ऑनलाईन बैठकीत घेतला. या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं असलं तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत, अशी माहिती  पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी या बैठकीत दिली. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या २ लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातल्या २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत.

गेल्या आठवड्यात रुग्णवाहिकांच्या ताफ्यामध्ये ३५० रुग्णवाहिका नव्यानं दाखल झाल्या आहेत. त्यासोबत प्राणवायू पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी महानगरपालिकेकडून ६ समन्वय अधिकारी अन्न आणि औषध प्रशासन खात्याकडे नेमण्यात आल्या आहेत.

तर मुंबईतल्या प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आल्या आहेत, असंही चहल म्हणाले.

यावेळी येत्या काळात मुंबई महानगरपालिकेला आवश्यक अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत, असं मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी सांगितलं.