नवी दिल्ली : पंतप्रधान 27 जुलै रोजी अतिशय अल्पावधीत सुसज्ज केलेल्या कोविड -19 चाचणी सुविधा प्रयोगशाळांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण करणार आहेत. या सुविधांमुळे देशातील चाचणी क्षमतेत झपाट्याने वृद्धी होणार असून वेळेवर निदान आणि उपचार करणे अधिक सुलभ होणार आहे. पर्यायाने महामारी रोखण्यात हातभार लागणार आहे.
नोएडा मधील आयसीएमआर-राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध व संशोधन संस्था, मुंबईच्या आयसीएमआर- राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्था आणि कोलकात्याच्या आयसीएमआर-राष्ट्रीय कॉलरा आणि आंत्र रोग संस्था येथे अतिशय अल्पावधीत सुरु करण्यात आलेल्या तीन चाचणी प्रयोगशाळा सुविधेमुळे प्रति दिन 10,000 पेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करता येईल. या प्रयोगशाळांद्वारे नमुना तपासणीत वेळेची बचत होईल आणि प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांना संसर्गजन्य क्लिनिकल सामुग्रीशी थेट संपर्क कमी होईल. या प्रयोगशाळा कोविड व्यतिरिक्त इतर रोगांची तपासणी करण्यास सक्षम आहेत आणि या महामारीनंतर हेपेटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, मायकोबॅक्टीरियम क्षयरोग, सायटोमेगालव्हायरस, क्लेमिडिया, निसेरिया, डेंग्यू इत्यादीची चाचणी घेण्यास सक्षम असतील.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री यांच्यासह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये भाग घेतील.