मुंबई : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात साकारत असलेल्या प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते होणार आहे.

कलिना येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात 19 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9.30वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जगभरातील सामाजिक परिवर्तनाच्या रचनात्मक आणि आंदोलनात्मक बाबींमध्ये विद्यार्थी व युवक चळवळीचे मोठे योगदान लाभले आहे. भारतातच नव्हे तर जगातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वा आर्थिक परिवर्तनामध्ये युवावर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. याचाच शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर नव्याने साकार करण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून जगभरातील विद्यार्थी व युवा चळवळींचा आंतरविद्याशाखीय तसेच तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील तसेच समकालीन विद्यार्थी युवा चळवळींची विचारप्रणाली,कार्यपद्धती, सामाजिक-राजकीय भूमिका व योगदान यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हे केंद्राचे वैशिष्ट्य असणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी व युवा वर्गाला त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करुन देत त्यांच्या माध्यमातून भारताचे स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावत नेणे हे या केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील एनजीओना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जाणार आहे. या केंद्रातील विद्यार्थी हे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक म्हणून युनो व त्यांच्याशी संलग्न आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये विविध पदांवर काम करु शकतील तसेच विविध देशाच्या दूतावासांमध्ये राजकीय सल्लागार या पदावर कामाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. या केंद्रातील विद्यार्थ्यांमधून आदीवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य,पाणी, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणारे सामाजिक नेते तयार होतील.

या केंद्रामध्ये अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करून पीएचडी अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी नेतृत्वविकास हा पाच दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात दोन वर्षाचा पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

या केंद्रामधील संशोधनात्मक प्रकल्पाअंतर्गत मायनर आणि मेजर रिसर्च प्रोजेक्टचा समावेश असेल. आयसीएसएसआर, आयसीसीआर आणि आयसीपीआर सारख्या विविध राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या संस्थांशी संलग्न राहून विद्यार्थी व युवक चळवळीशी निगडीत अनेक पैलूंवर सखोल संशोधन करणारे रिसर्च फेलो या सेंटरचा महत्त्वाचा घटक असणार आहे. याचबरोबर पीएचडीसाठीचे संशोधनही या केंद्रामध्ये चालणार आहे. या सातत्यपूर्ण संशोधनाबरोबरीनेच वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन दरवर्षी केले जाणार आहे. देश-विदेशातील संशोधकांना आपले संशोधन मांडण्यासाठी व परस्पर चर्चेसाठी हे केंद्र उत्तम व्यासपीठ म्हणून नावारुपाला येणार आहे. याशिवाय एक-दोन महिन्याच्या कालावधीसाठी इंटर्नशिप प्रोग्रामही चालविले जाणार असून समर स्कूल/ विंटर स्कूलच्या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांना इंटर्न म्हणून संशोधन तसेच प्रत्यक्ष फिल्डवर्कचा अनुभव घेता येईल. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी आर्ट गॅलरी, यद्ययावत ग्रंथालय तसेच दृक-श्राव्य माध्यमांचा प्रभावी उपयोग करुन बनविलेले संशोधन साहित्य यांचा समावेश असणार आहे.

या केंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाने 25 कोटी  रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, रिसर्च फेलो, ग्रंथपाल आदी11 पदांची निर्मिती करण्यात आली असून त्याचा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे. याशिवाय जिल्हा विकास निधीमधून सेंटरच्या बांधकामासाठी 12कोटी 54 लाख रुपये मुंबई विद्यापीठाला मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विविध कंपन्यातील सीएसआर निधीअंतर्गत आर्थिक सहाय्य या केंद्राला लाभणार असून सुरुवातीपासूनच हे केंद्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यात आले आहे. या केंद्रातील शैक्षणिक उपक्रमांमधून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देतील असे सशक्त युवा पदवीधर, संशोधक आणि नेतृत्व तयार होईल असा आशावाद व्यक्त केला जातो आहे.