नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 5-जी सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5- जी इंटरनेट सेवेचा प्रारंभ करताना बोलत होते. आजच्या तारखेची इतिहासात नोंद होणार असून आपण प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 5-जी तंत्रज्ञानामुळे देशाच्या गावागावात क्रांती होणार असून शैक्षणिक क्रांतीही होणार आहे असं त्यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावणार असल्याचं ते म्हणाले ग्रामीण भागात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून एक लाख 75 हजाराहुन अधिक ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर पोचल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. 5- जी  सेवेसाठी पहिल्या टप्प्यात तेरा शहरांचा समावेश असून मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात 5- जी सेवा पोहोचणार असल्याचं ते म्हणाले.  मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं  सांगून मोबाईल उत्पादनात भारत कोणत्याही देशावर अवलंबून नसल्याचं ते  म्हणाले.

देशात मोठ्या प्रमाणावर डेटा क्रांती होत असून 5-जी मुळे तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं मोदी यांनी  सांगितलं.  5-जी सेवेमुळे इंटरनेटचा वेग दहापट अधिक वाढणार असून फोनवरचा संवाद विनाअडथळा होईल तसंच संपूर्ण चित्रपट केवळ दहा सेकंदात डाउनलोड करता येईल असं ते म्हणाले. १३० कोटी भारतीयांना 5-जी च्या माध्यमातून बक्षीस देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान 5-जी सेवेमुळे सर्वच क्षेत्रांसह शैक्षणिक क्षेत्रातही मोठी क्रांती घडून येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज पनवेल इथं महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थांशी संवाद साधताना बोलत होते. 5-जी सेवेमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल असं ते म्हणाले.