पुणे: सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा करून आपण पूरग्रस्तांच्या समस्या जणून घेतल्या. काही गावांना व शिबीरस्थळांना भेटी दिल्या. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची माहिती घेतली. निधीची अजिबात कमतरता भासणार नाही, तथापि, योग्य पध्दतीने मदत व पूनर्वसन होण्यासाठी विभागीय स्तरावर सुसूत्रता ठेवण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना डॉ.म्हैसेकर म्हणाले, विभागस्तरावर विभागीय आयुक्त कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष कार्यरत आहे. यासाठी विविध अधिकाऱ्यांवर योग्य ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते सातत्याने बाधित जिल्ह्याच्या संपर्कात असतात. शुक्रवारी सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील शिरगांव व पलूस तालुक्यातील बुर्ली येथे भेट दिली. सांगली शहरातील सांगलीवाडी, स्टँड परिसर याभागातील अडचणी समजून घेतल्या.
पूरग्रस्तांनी धोकादायक घरात अजिबात राहू नये, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल, अशा सूचना दिल्या आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न आहे,पाणी व वीज पुरवठा. त्यानंतर जीवनावश्यक वस्तू. या बाबी पुरवण्याच्या दृष्टीने सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहे. रोगराई व साथीच्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय पथक काम करीत आहे. फाँगीग माशीन, पोर्टेबल जेटींग मशीन, टीसीएल पावडर, डस्टींग पावडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिर, पूल आदींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ते म्हणाले, पंचनामे पारदर्शक पध्दतीने होतील. नियमानुसार सर्वांनाच मदत होईल. सानुग्रह अनुदान व धान्य वाटप व्यवस्थित होत आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा काम करीत आहेत.
दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड, टाकळीवाड येथील शिबीरांना भेट दिली, नृसिंहवाडी येथील पूरस्थितीची पाहणी केली. तसेच करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावाला भेट दिली. कोल्हापूर शहरातील कुंभारगल्ली, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर या भागांची पाहणी करून मुस्लिम बोर्ड शिबिराला भेट दिली .नंतर आढावा बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. ज्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या त्याठिकाणी योग्य त्या सूचना केल्या आहेत. शासन व स्वंयसेवी संस्था व व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. परंतु त्यात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने प्रशासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
दोन्ही बाधित जिल्ह्यातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले .