नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण विभाग प्रमुख आणि सैन्य व्यवहार विभाग सचिव जनरल बिपिन रावत, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी आज येथे कारगिल संघर्ष किंवा ‘ऑपरेशन विजय’ मधील भारताच्या विजयाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांना राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये जाऊन आदरांजली वाहिली. 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये भारतीय सशस्त्र दलाचा विजय म्हणजे मजबूत राजकीय, लष्करी आणि मुत्सद्दी कृतीची गाथा आहे. अतिशय अभिमानाने, सन्मानपूर्वक आणि चैतन्यमय वातावरणात संपूर्ण राष्ट्र हा दिवस साजरा करीत आहे.

“आज कारगिल विजय दिनानिमित्त शत्रूपासून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शूर सैनिकांप्रती मी आदर व्यक्त करतो आणि त्यांना अभिवादन करतो. आमच्या शहीद वीरांचे धैर्य, पराक्रम, संयम आणि निश्चय देश कायम स्मरणात ठेवेल आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानातून प्रेरणा घेऊन पुढे जाईल.” असा संदेश संरक्षणमंत्र्यांनी युद्ध स्मारकातील अभ्यागतांच्या पुस्तकात लिहिला आहे. ते म्हणाले की कारगिल विजय दिवस हा फक्त एक दिवस नाही तर या देशातील सैनिकांच्या धैर्य व पराक्रमाचा सोहळा आहे.

भारतीय हवाई दलाच्या मदतीने संघर्ष जिंकण्यासाठी भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांनी अतिशय उंचावरील अडथळ्यांचा, प्रतिकूल प्रदेश आणि हवामानाचा निकराने सामना करीत प्रबळ शत्रूवर विजय मिळविला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी, राष्ट्र अभिमानाने शहीद वीरांच्या स्मरणार्थ हा विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा करीत आहे.

संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि संरक्षण मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ नागरी व सैन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.