मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात १ ते ३१ मे या कालावधीत दीड कोटीहून अधिक शिधापत्रिकाधारकांना ७४ लाख ८४ हजार क्विंटल अधिक अन्नधान्याचं वाटप केलं असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

याच काळात ३३ लाख ८४ हजार ४० थाळ्यांचं वाटप केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान संचारबंदीच्या काळात राज्यात ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमार्फत राज्यातील १ कोटी ५२ लाख ५२ हजार शिधापत्रिकाधारकांना धान्याचं वितरण सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी सुमारे २० लाख ५५ हजार ४२० क्विंटल गहू, १५ लाख ७९ हजार ११८ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ८८७ क्विंटल साखरेचं वाटप केल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय अन्नधान्याची कृत्रीम टंचाई निर्माण करून, त्याची चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जात असल्याचंही ते म्हणाले.