नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जोर आता हळूहळू कमी होतो आहे. पहाटे विदर्भात असलेलं हे वादळ वेग कमी करत ईशान्येकडे वाटचाल करत असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
या वादळानं रायगडमध्ये दोघांचे बळी घेतले आहेत. वीज मंडळाची डीपी अंगावर पडून अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ बाबू वाघमारे यांचा मृत्यू झाला. श्रीवर्धन तालुक्यातल्या सोयगाव गवळीवाडा इथल्या अमर पंढरीनाथ जावळकर या 16 वर्षाच्या मुलाच्या अंगावर भिंत पडून त्याचा मृत्यू झाला.
मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. अलिबाग नजिक रामराज येथील एक जण वीजेची डीपी पडल्याने जखमी झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाने रायगडमधील आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आंब्याच्या झाडांखाली आंब्याचे सडे पडल्याने आंबा बागाईतदार हवालदिल झाले आहेत. रायगड जिल्ह्यात कालच्या चक्रीवादळामुळे पडलेले विजेचे खांब पूर्ववत करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळं ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरू होण्यास वेळ लागणार आहे. पडलेली झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम एनडीआरएफ च्या मदतीने जिल्हा प्रशासन करत आहे. कोसळलेले विजेचे खांब, कोसळलेली झाड, पडणारा पाऊस हे धोके लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. जिल्ह्यासाठी विशेष पॅकेजची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मालवण तालुक्याला बसला आहे.
उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वाहिन्या आणि उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्यान विजेचे शेकडो खांब जमीनदोस्त झाले आहेत. ताराही तुटल्या आहेत.
मालवण तालुक्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर जंगलात अनेक ठिकाणी मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडल्यान अख्खा मालवण तालुका अंधारात गेला आहे. अन्य पर्यायी मार्गान वीजपुरवठा सुरळीत करण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे.
प्रत्येक वाहिनी सुस्थितीत असल्याची खात्री झाल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करणे जोखमीचे आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेन कामाला लागली असून सर्वप्रथम उपकेंद्रांचा वीजपुवठा सुरु केला जाईल आणि तेथून पुढे टप्प्या-टप्प्यान ११ केव्ही आणि लघुदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा लागणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी संयम राखून यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणला वेळ द्यावा असे आवाहन सिंधुदूर्गचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी केलं आहे. मालवण वगळता इतर शहरांचा वीजपुरवठा सुरू करण्यात यश आला असल्याची माहिती त्यांनी दिली. चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला या भागात शेतीचे काहीअंशी नुकसान झाले आहे.
द्राक्ष, इतर फळबागा व भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. मनमाड परिसरात वादळामुळं पाऊस झाला. पोल्ट्रीचे शेड उडाल्याने, कांदाचाळीचे पत्रे उडाल्याने अंदरसुलमध्ये नुकसान नोंदवले गेले आहे. बऱ्याचशा भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. सप्तशृंगी गडावर दरड कोसळली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सिल्लोड तालुक्यात कासोद इथं विजेचे खांब कोसळले. अनेक घरांवरचे पत्रे उडाले, यात काही जनावरांना मार लागला, मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
निसर्ग चक्री वादळाचे परिणाम वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दिसून येत आहेत. काल दिवसभर अधून मधून पाऊस पडत होता. तर आज पहाटेपासून ताशी 20 ते 25 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत आहेत. या मुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो आहे. निसर्ग वादळाचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये पहावयास मिळाला.
जोरदार वाहणाऱ्या वादळामुळे खिरविरे विभागातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील चंदगिरवाडी व ईदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झालेले आहे.
शैक्षणिक साहित्य व मुलांना बसायचे बेंचेस यांचेही मोठे नुकसान झालेले आहे. शाळेचे छत उडून गेल्याने कौलांचे मोठे नुकसान आहे.