मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्याकरिता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी ‘आरोग्यसेतू’ ॲपचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, यासाठी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच राज्यातील कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
राज्यात सध्या जे कंटेनमेंट झोन आहेत त्यात अजून वाढ होऊ नये आहे त्यातच प्रभावीपणे क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे काम करू शकते, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. या ॲपसंदर्भात अधिक जाणीवजागृतीची गरज असल्याचे सांगतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोहिम हाती घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
या ॲपबाबत सामान्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यभरात मालेगाव, जळगाव, अकोला दौरे केले त्यात काही भागाचा मृत्यू दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. शेवटच्या क्षणाला उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी आणि लवकर निदानासाठी आरोग्यसेतू ॲप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सामान्य नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केले तर त्याबाबत प्रशासनाला आणि आरोग्य अधिकाऱ्यांना वेळीच माहिती मिळू शकेल. लोकांनाही स्वताच्या आरोग्याची काळजी घेता येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, संचालक डॉ. साधना तायडे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, नागपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी उपस्थित होते.