नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ नंतरच्या जगात वावरण्यासाठी नियंत्रण आणि आदेशांची संस्कृती मागं टाकून देश सज्ज झाला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स च्या पंच्याण्णवाव्या वार्षिक अधिवेशनाला ते आज दूरदृष्य प्रणाली मार्फत संबोधित करत होते. सरकारच्या लोकाभिमुख धोरणांची माहिती देऊन ते म्हणाले की कोविडोत्तर जगात धाडसी गुंतवणूक आणि धाडसी निर्णयांची गरज आहे.

घरोघरी पुरवठा करणाऱ्या देशांतर्गत सेवेचं जाळं उभारण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. देश सध्या एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करत आहे मात्र त्यानं खचून न जाता अधिक जोमानं पुढं वाटचाल करत आहे, असं ते म्हणाले. आत्मनिर्भरता हे उद्दिष्ट ,सरकारच्या प्राधान्यक्रमात गेली ६ वर्षं होतं, आता कोविड १९ च्या संकटामुळे त्याला अधिक चालना मिळाली आहे.

आयात कमी करुन देशांतर्गत उत्पादन वाढवण्य़ाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे असं ते म्हणाले. कोविड काळात छोटे व्यापारी आणि दुकानदारांनी केलेल्य़ा कामाची त्यांनी प्रशंसा केली. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच शेतकरी हितासाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली.