औरंगाबाद येथील कोविड केअर सेंटर व विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
औरंगाबाद : आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्याप्रमाणात लाभ होतो. शासन आरोग्य सुविधा राज्यभर मोठ्याप्रमाणात उपलब्ध करुन देत आहे. तरी देखील नागरिकांनी सध्याची कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घ्या. शारिरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या सवयी अंगीकारून कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ कोविड केअर सेंटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून झाले. यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचीही या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती होती. तसेच मंचावर उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अन्बलगन यांची उपस्थिती होती.
श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या समन्वयातून भरीव कार्य होत आहे. या आपत्तीकाळात लढण्यासाठी आयुधांची आवश्यकता आहे. ही आयुधे शासन राज्यभरात उपलब्ध करुन देत आहे. मार्च 2020 पासून आजपर्यंत सरासरी दररोज एक विषाणू प्रयोगशाळांची उभारणी राज्यात होते आहे. लवकरच राज्यात शंभरहून अधिक विषाणू तपासणी प्रयोगशाळा होतील, असा विश्वासही श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोरोनासारख्या आजारावर औषध अजूनतरी उपलब्ध नाही, परंतु तरी देखील सहा महिन्याच्या बाळापासून ते 94 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण राज्यात बरे होऊन घरी परतले आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आरोग्य सुविधा अधिक वाढविण्यासाठी शासन मोठ्याप्रमाणात कार्य करत आहे. राज्याच्या उद्योग विभागाकडून आरोग्य विभागासाठी रुग्णालय व प्रयोगशाळा उभारण्यात आले. ही कौतूकास्पद व अभिमानास्पद बाब असल्याचेही श्री. ठाकरे म्हणाले. लोकांमध्ये कोविड 19 बाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती झाल्यास रुग्णालये, तपासणी यांचा वापर कमीप्रमाणात होईल. तसेच नागरिक कोरोनामुक्तच राहतील, यासाठी सर्वतोपरी उपाययोजन करण्यावर भर देण्याच्या सूचना श्री. ठाकरे यांनी प्रशासनाला केल्या.
उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी औरंगाबादकरांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने चिकलठाणा येथील बंद पडलेल्या मेल्ट्रॉन कंपनीच्या बांधीव इमारतीत 256 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. संबंधित रुग्णालय संसर्गजन्य आजारासाठी कायमस्वरुपी असावे, अशा स्वरुपाचे आगामी नियोजन आहे. मुंबईतील कस्तुरबा, पुण्यातील नायडू संसर्गजन्य रुग्णालयाच्या धर्तीवरच औरंगाबादेतही संसर्गजन्य आजारावरील उपचार व्हावेत, मराठवाडा विभागासाठी असे रुग्णालय आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन, त्याचबरोबर सध्याच्या कोविड 19 परिस्थिातीत या रुग्णालयाची गरज असल्यानेच तत्काळ या रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे, असेही श्री. देसाई म्हणाले.
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्र कायमस्वरूपी सुरु करण्यात येत आहे. या निमित्ताने मराठवाडा विभागासाठी आवश्यकता असलेली प्रयोगशाळा औरंगाबादच्या ‘ऑरिक सिटी’च्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यास हातभार लागलेला आहे. कायमस्वरुपात येथे संसर्गजन्य रुग्णालय, विषाणू तपासणी प्रयोगशाळा यांची देखभाल येथील प्रशासनामार्फत करण्यात येईल, असे निर्देशही प्रशासनाला त्यांनी यावेळी दिले. महामंडळाच्यावतीने अल्पावधीत कोविड केअर सेंटरची उभारणी केल्याबद्दल त्यांनी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचारी यांचे कौतूक केले. कुणालाही रुग्णालयाची आवश्यकता भासू नये, परंतु गरज पडली तर शासनाने चांगल्या व सुसज्ज अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन नागरिकांनी वेळेत उपचार घेऊन ठणठणीत बरे व्हावे, असेही श्री.देसाई म्हणाले.
औरंगाबादेत महामंडळाच्यावतीने उभारलेल्या 256 खाटांच्या कोविड केअर सेंटरमध्ये 128 खाटांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. याबरोबरच आयसीयू, एक्स-रे आदी आवश्यक सुविधाही याठिकाणी आहेत. या रुग्णालयासाठी लागणारे 115 मनुष्यबळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. देशाच्या तुलनेत राज्यात मोठ्याप्रमाणात कोविड 19 नियंत्रणासाठी सर्वोत्तम अशी कामगिरी होत असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले.
मालेगाव, धारावी येथील यशोगाथांप्रमाणे कोविड 19 वर नियंत्रणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. टोपे यांनी केले. औरंगाबादेत कोविड केअर सेंटर व विषाणू तपासणी प्रयोगशाळा उभारणी केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करुन कोविड उपचाराच्या सुविधा नागरिकांना पुरविण्याला प्राधान्य आहे. तरीही नागरिकांनी कोविड -19 ची लक्षणे दिसताच तत्काळ रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन औरंगाबादेतील मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल. या कोविड 19 नियंत्रणासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचेही मोठ्याप्रमाणात सहकार्य मिळत आहे. या सर्वांनी औरंगाबाद कोरोनामुक्त करण्याची कामगिरी पाडावी, अशी अपेक्षाही श्री. टोपे यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी मराठवाड्याच्या राजधानीत कोविड 19 रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोविड केअर सेंटरसारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच या संकटकाळात सर्वांच्या सहकार्याने कोविड-19 महामारीवर मात करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यमंत्री तटकरे यांनी औरंगाबादेत महिनाभरात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले, ही कौतुकास्पद बाब आहे. शासनाकडून सर्वात अधिक लक्ष आरोग्य विभागाकडे देण्यात येत आहे. शिवाय कोणताही नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारीही घेण्यात येत आहे. आवश्यक ती सर्व साधनसामुग्री आरोग्य यंत्रणांना शासन पुरवित आहे. तरी देखील नागरिकांनी सतर्क राहत खबरदारी घेऊन कोरोनाच्या या आपत्तीकाळात काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अन्बलगन यांनी करताना कोविड केअर सेंटर सर्व सोयीसुविधांयुक्त महामंडळाच्यावतीने तयार करण्यात आले आहे. सामाजिक भान जपत उद्योग विभागाने कोविड -19 च्या काळात मोठ्याप्रमाणात मास्क, पीपीई कीट, अन्नधान्य, फूडपॅकेटचे मोफत वाटप केले आहे. औरंगाबादचे कोविड केअर सेंटर पालकमंत्री श्री. देसाई यांच्या निर्देशानुसार अल्पावधीत व प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देऊन महिनाभरात ते निर्माण केल्याचेही ते म्हणाले. सुरूवातीला कोविड केअर सेंटर उभारणीच्या प्रवासावर आधारीत लघुपट महामंडळाच्यावतीने दाखविण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार भागवत कराड, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचीही उपस्थिती होती.