नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
भाजीपाला, फळं, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. ‘कोरोना’च्या धोक्यापासून दूर राहण्यासाठी जबाबदारीने वागावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत राहील, भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येईल, त्यांचं नुकसान होणार नाही, असं त्यानी स्पष्ट केलं.
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरु, व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु. मास्क, सॅनिटायझर, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकू असा इशारा पवार यांनी दिला.