नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार झालेलं नसून, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा भागातली बरीचशी जमीन पाण्याखाली गेली आहे, असं राज्यसरकारच्या निवेदनात म्हटलं आहे.
या धरणाच्या बांधकामासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी समझोता करार केला होता. संबंधित क्षेत्रातल्या वनाधिका-यांवर दबाव आणून अतिरिक्त जमीन घेतली असल्याचं राज्यशासनाचं म्हणणं आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या या समितीला अहवाल महिनाभरात सादर करायचा आहे.