नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड -19 संबंधित व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयाला अचानक भेट दिली. अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले की, प्रत्येक कोरोना रुग्णालयाच्या कोरोना प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून तेथे देखरेखीची व्यवस्था असेल आणि रूग्णांच्या समस्याही सोडविता येतील.  

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना हेही निर्देश दिले की, अन्न पुरवठा करणाऱ्या कॅन्टीनसाठी पर्यायी (बॅक-अप) व्यवस्था देखील स्थापित केली जावी, जेणेकरुन एका कॅन्टीनमध्ये संसर्ग झाल्यास रूग्णांना विना अडथळा दुसऱ्या कॅन्टीनमध्ये जेवण मिळू शकेल.

अमित शहा यांनी कोरोना रूग्णांच्या उपचाराच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांचे मनो-सामाजिक समुपदेशन करण्याचे निर्देश देखील दिले. यामुळे हे सुनिश्चित होईल की, ते केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर, मानसिक दृष्ट्या देखील साथीच्या रोगाचा सामना करण्यसाठी सक्षम असतील.