नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीएसई बोर्डाच्या १० वी तसंच १२ वीच्या परिक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केलं जाईल, याची योजना बोर्डाने २२ जून पर्यंत सादर करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आय सी एस ईच्या १० वीच्या बोर्ड परिक्षा पुढे ढकलल्या होत्या . परंतु या परिक्षांना विद्यार्थी हजर राहिल्यास कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं, म्हणून विद्यार्थ्यांना परिक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिले.

आय सी एस ई बोर्डाने सर्व संलग्न शाळाक़डून १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे गुण मागवून घेतले असून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने गुणवाटपाची योजना आखली जाईल.

राज्य सरकारनं परिक्षा घेण्यास मनाई केली तरी आय सी एस ई बोर्ड तो निर्णय स्वीकारेल असं बोर्डाच्या वकीलांनी आज न्यायालयात सांगितलं.