नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय. आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. नियंत्रण रेषेवरुन दोन्ही बाजूंनी सैन्य मागं घेण्याचा आणि संघर्ष थांबवण्याचा निर्णय ६ जूनला दोन्ही देशांच्या वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला होता, याकडे त्यांनी वँग यांचं लक्ष वेधलं.
गेला आठवडाभर या कराराची अंमलबजाणी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका होत आहेत, या दिशेनं काही अंशी प्रगती झालेली असताना चीननं नियंत्रण रेषेवर भारताच्या भूभागात बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही चकमक झाली, त्यात दोन्ही सैन्यांची जीवितहानी झाली, असं त्यांनी सांगितलं.
या घडामोडींचा उभय देशांमधल्या संबंधावर गंभीर परिणाम होईल, म्हणून दोन्ही देशांच्या सैन्यानं झालेल्या करारांचा सन्मान राखला पाहिजे, सीमा पाळल्या पाहिजेत, आणि त्यात बदल करण्यासाठी एकतर्फी कारवाया करु नयेत, असंही त्यांनी सांगितलं.
चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावर चीनची भूमिका स्पष्ट केली. एकंदर परिस्थिती जबाबदारीनं हाताळली पाहिजे आणि ६ जूनच्या निर्णयाची दोन्ही बाजूंनी अंमलबजावणी केली पाहिजे, शांतता राखली पाहिजे, यावर त्यांनी सहमती व्यक्त केली.