नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातल्या कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.
बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” या टॅबव्दा्रे माहिती मिळू शकते.
शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे या गोष्टीही या वेबसाइटवरुन करणं शक्य आहे.