नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातला इंधनाचा दर ३५ ते ३७ डॉलर  एवढाच आहे. तरी दोन आठवड्यांपासून होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनाकलनीय असल्याचं मत फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केलं आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा दर लिटरमागे ८५ रुपये ७० पैसे आहे. देशातला हा सर्वाधिक दर आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल लिटरमागे १० रुपये ४१ पैशांनी महाग झाले आहे. आज मुंबईत डिझेलचा दर लिटरमागे ७८ रुपये ३२ पैसे आहे.

गेल्या दोन आठवड्यात डिझेल १० रुपये १० पैशांनी महाग झालं आहे. पेट्रोलची मुंबईतली आतापर्यंतची सर्वाधिक किंमत ९१ रुपये ३४ पैसे होती. तर डिझेलची आतापर्यंतही सर्वाधिक किंमत ८० रुपये १० पैसे होती. ४ ऑक्टोबर २०१८ रोजी हा उच्चांक गाठला गेला होता.

लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र वाहतुकीवर निर्बंध असल्याने या काळात पेट्रोल-डिझेलचा खप गेल्या १२ वर्षातल्या निचांकी पातळीवर गेला होता.

फेब्रुवारीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोलचा केवळ एक तृतीयांश खप झाला होता. तर डिझेलचा खप निम्मा झाला होता.