नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूरच्या विलासराव  देशमुख  शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्थेच्या  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णाला, महागडं औषध बाहेरून आण्याची शिफारस केल्याप्रकरणी, वैद्यकीय शिक्षण संचालकांनी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

याबाबत तीन दिवसात स्पष्टीकरणही मागितलं आहे. सर्व कोव्हीड रुग्णांवर शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असूनही, कोव्हीड  उपचारासाठी  आवश्यक असलेलं टॉसिलीझुमाब हे महागडं औषध,  रुग्णाला बाजारातून विकत आणायला सांगण्यात आलं.

या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधित रुग्णाची गैरसोय झाली असून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले असून या रुग्णावरील उपचाराचा सर्व खर्च, शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार, शासनामार्फतच करण्यात येईल असं स्पष्टं केलं आहे.