नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ४२ कोटीपेक्षा जास्त गरीब लोकांना ६५ हजार ४५४ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं आहे. एक लाख ७० हजार कोटी रुपयांच्या या पॅकेजअंतर्गत महिला आणि गरीब ज्येष्ठ नागरिक तसंच शेतक-यांना मोफत अन्नधान्य आणि रोख मदत सरकारनं जाहीर  केली आहे. त्याच्या अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्यसरकार लक्ष देत आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी आठ कोटी ९४ लाख लाभार्थ्यांना १७ हजार ८९१ कोटी रुपये दिले आहेत. जनधन खातेधारक सर्व महिलांच्या खात्यांवर पहिल्या हप्त्यापोटी १० हजार ३२५ कोटी रुपये जमा केले आहेत.

दुस-या हप्त्यात दहा हजार ३१५ कोटी, तर तिस-या हप्त्यात १० हजार ३१२ कोटी रुपये जमा केले आहेत. दोन कोटी ८१ लाख वयोवृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना दोन हप्त्यांमधे २ हजार ८१५ कोटी रुपये वितरित केले आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना चार हजार ३१२ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्थलांतरित मजुरांना दोन महिने मोफत अन्नधान्य आणि हरभरा डाळ पुरवण्याची घोषणा सरकारनं केली होती. त्यानुसार कालपर्यंत सहा लाख ३० हजार टन अन्नधान्य आणि ३४ हजार ७४ टन हरभरा डाळ राज्यांना दिली आहे.

सरकारी रुग्णालयं आणि आरोग्य सेवा केंद्रांमधल्या आरोग्य कर्मचा-यांसाठी ३० मार्चपासून विमा योजना लागू केली आहे. न्यू इंडिया एश्योरन्स मार्फत त्याची अंमलबजावणी होत असून, या योजनेचा कालावधी सप्टेंबर पर्यंत वाढवला आहे.