नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची तातडीची आवश्यकता आहे;  विशेषतः जेव्हा माध्यमं वर्जित क्षेत्रातही हस्तक्षेप करत आहेत अशा काळात याची सर्वाधिक गरज आहे, असं मत महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केलं.

आरोपीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला असताना दूरचित्रवाणी वाहिन्या आरोपीच्या व्हॉटस ऍपवरील खाजगी संभाषण प्रसारित करत आहेत. यामुळे आरोपीबाबत पूर्वग्रह तयार होऊ शकतो; जो न्यायव्यवस्थेसाठी घातक आहे असंही वेणूगोपाल यांनी सांगितलं. सध्या भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणांवर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमं मत प्रदर्शन करत आहेत असं वेणूगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं.