मुंबई : मुंबईत पडणाऱ्या पावसाचं पाणी आसपासच्या उद्योग धंद्यांसाठी तसंच सिंचनासाठी वापरावं, असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुचवलं आहे. मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीमुळे साचणारं पाणी तसंच सांडपाणी ठाणे जिल्ह्याच्या दिशेनं वळवलं तर त्याचं शुद्धीकरण करुन ते धरणांमधे साठवता येईल. हे पाणी नीट वाहून नेलं तर नाशिक आणि अहमदनगरसारख्या बागायती शेतींच्या जिल्ह्यांमधे, तसंच दुष्काळग्रस्त भागांमधेही वापरता येईल, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुंबईचे रस्ते, वाहतूक, सांडपाणी आणि पुराच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सखोल विचार करुन योजना बनवण्याची गरज आहे. त्यासाठी वाटलं तर परदेशी सल्लागाराची मदत घ्यावी, असंही त्यांनी सुचवलं आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण इत्यादी नेत्यांना पाठवल्या आहेत.