नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक – मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग असे कोणतेच भेदभाव नाहीत, तो राष्ट्राच्याही पलीकडचा आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. हा विश्व बंधुत्वाचा, मानवतेच्या एकरुपतेचा दिवस आहे, असं ते  म्हणाले. कोरोना महामारीमुळं आज  सारं जग योगाकडे पूर्वीपेक्षा अधिक गांभिर्यानं बघत आहे.

आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल, तर कोरोनावर मात करायला मदत होते. योग साधनेत  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पद्धती असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात सर्वचजण घरातच योग साधना करत आहेत. याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं. ‘माय लाईफ माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेला मिळालेला अपूर्व प्रतिसाद, जगभरात योगा प्रति उत्साह वाढत असल्याचं निदर्शक आहे, असं त्यांनी नमूद केलं. अनेक संस्कृत वचनांचा दाखला देत, योगामुळे कृतीप्रवणता वाढीला लागून विकास साधला जाऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवन इथं हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासनं केली. यावेळी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही योगवर्गात सहभाग घेतला.

चित्रपट सृष्टीतल्या कलावतांनीही आपआपल्या समाजमाध्यम अंकाऊट वरुन योगाचा प्रचार आणि प्रसार केला.  नवी मुंबईत शाळा आणि महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीनं योग दिन साजरा करण्यात आला. या योगवर्गात विद्यार्थी आणि पालक घरातूनच सहभागी झाले होते.

नवी मुंबई महानगरपालिकेनही कोरोना बाधित रूग्णांसाठी योग आणि  प्राणायाम शिबिराचं आयोजन केलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यात “घरोघरी योग – परिवारासह योगा” या संकल्पनेचा  पुरस्कार करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.

पुणे इथं लष्कराच्या दक्षिण विभागातल्या जवान आणि त्यांच्या कुंटुबियांनी देखील योग दिवस साजरा केला तसंच कोरोना विरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

अमरावती इथं जागतिक योग दिनाच्या निमित्तानं पाण्यावर तरंगणारे योगाचे विविध प्रकार सादर करण्यात आले.

जळगावात सावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऑनलाइन पद्धतीनं सकाळी सात वाजता योग सत्राचे आयोजन करण्यात केलं होतं.

वाशिम शहरात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अनेक संस्थांनी योग अभ्यास वर्गाचं आयोजन केलं होतं.

नांदेड शहरात अनेक योगाभ्यासकांनी घरीच छतावर योगाभ्यास केला.

बीड जिल्ह्यात पंतजली योग समितीनं सुरक्षित अंतर राखत योग दिन साजरा केला. गेल्या वर्षी समितीनं ३६५ दिवस योगवर्ष साजरं केलं होतं.

धुळे जिल्ह्यात साक्री इथं विविध क्रीडा संघटनानी मिळून सामूहिक योग दिन साजरा केला.