नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येची घनता जास्त असूनही जगाच्या तुलनेत भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे कोविड १९ बाधित व्यक्तींचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं WHO , अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं काल जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. कोविड १९ चं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे कोविड बाधित व्यक्तींचं प्रमाण ३० पूर्णांक ४ शतांश असून जगात ते सरासरी ११४ पूर्णांक ६७ शतांश पेक्षा जास्त आहे.
अमेरिकेत एक लाख लोकसंख्येमागे कोविड बाधित व्यक्तींचं प्रमाण ६७१ पूर्णांक २४, जर्मनीमध्ये ५८३ पूर्णांक ८८, स्पेनमध्ये ५२६ पूर्णांक २२, तर ब्राझीलमध्ये ४८९ पूर्णांक ४२ इतकं असल्याचं WHO च्या अहवालात म्हटलं आहे.
देशात कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांचा प्रमाण ५५ पूर्णांक ७७ शतांश इतकं झालं असून सध्या कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
कोरोना चाचणी करण्यासाठी देशात एकूण ७२३ सरकारी, तर २६२ खासगी प्रयोगशाळा कार्यान्वित असून, दैनिक चाचण्यांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ४३ हजार २६७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, तर देशात आतापर्यंत एकूण ६९ लाख ५० हजार ४९३ कोविड चाचण्या झाल्याचं आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे.