ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : अखंडित वीज उत्पादनाचे  कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.

महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यूदेखील कोरोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल.

ह्याकरिता, मृत्यूचे कारण हे  कोविड-१९ विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र  शासकीय/पालिका/महानगरपालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.