मुंबई : वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी आज महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

वन विकास महामंडळाच्या सभा कक्षात श्री.राठोड यांनी आज विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षण व वनबल व  वनबलप्रमुख  डॉ. सुरेश गौरोला, व्यवस्थापकीय संचालक  डॉ. एन. रामबाबू, बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस. के. रेड्डी, मुख्य महाव्यवस्थापक  श्रीनिवास राव, श्रीमती  एम्तिएन्ला आओ, महाव्यवस्थापक डॉ. ऋषीकेश रंजन आदी यावेळी उपस्थित होते.

वन विकास महामंडळाच्या ताब्यातील जंगलाचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने 14 वन प्रकल्प विभागाकरिता व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून त्यास केंद्र शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मंडळाच्या विविध योजनांमधून सागवान, बांबू, शिसव व इतर मिश्र प्रजातींची उत्कृष्ट रोपवने तयार करण्यात आली आहे. मंडळातर्फे एकूण 5 लाख 46 हजार  684  हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय साग बियाणांची ऑनलाईन विक्री त्याचप्रमाणे इमारतीसाठी लागणारे लाकूड, जळावू लाकूड व बांबूची विक्री करण्यात येते. श्री. राठोड यांनी यावेळी वनोपज विक्री ई-लिलाव व जाहीर लिलावाद्वारे  वन विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली  येणाऱ्या 15 विक्री आगारांची  माहिती  घेतली.

वन विकास महामंडळातर्फे निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये मोहुर्ली व कोलारा, नागझिरा, पिटेझरी, उमरझरी, बोर तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कोसमतोंडी येथे गृह पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत, याबाबत मंत्री श्री.राठोड यांनी समाधान व्यक्त केले.