नवी दिल्‍ली : चिनी संगणक हॅकर्सनी गेल्या पाच दिवसात देशातल्या माहिती तंत्रज्ञान संस्थानं आणि बॅंकिंग क्षेत्रात ४० हजारापेक्षा जास्त सायबर हल्ले केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. चीनमधल्या चेंगडू भागातून बहुतांश हल्ले झाल्याची माहिती पुढं आल्याचं सायबर शाखेचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितलं. बॅंकिंग, पायाभूत सुविधा तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अडचणी निर्माण करणं हा या सायबर हल्ल्यांमागचा प्रमुख हेतु असल्याचं ते म्हणाले.

इंटरनेट वापरकर्त्यांनी सावधानता बाळगावी, आपला डेटा सुरक्षित राहावा यासाठी फायरवॉलचा उपयोग करावा यासह सायबर शाखेनं सुचवेलल्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. चीनी  हॅकर्सकडे २० लाख भारतीयांच्या इमेल आयडी संदर्भात माहिती असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे, असं ते म्हणाले.

सरकारी संस्थांच्या नावे बोगस संदेश पाठवले जाऊ शकतात, विशेष करुन कोविडची मोफत चाचणी करुन देण्याबाबत फसवा संदेश पाठवला जाऊ शकतो. ncov2019@gov.in या इमेल आय डी वरुन प्रामुख्यानं मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चैनई आणि अहमदाबाद या ठिकाणी सायबर हल्ला होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.