नवी दिल्‍ली : केन्द्र सरकारनं अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांचा लाभ गरीबांना होत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीच्या काळात आर्थिक फटका बसलेल्या गरीबांच्या थेट बँक खात्यात तातडीची मदत राज्य सरकार जमा करत असल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांना सांगितलं.

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर यायला थोडा वेळ लागेल. सध्या सरकारचं पूर्ण लक्ष कोरोनाचा प्रसार रोखणं आणि मृत्यूदर कमी करण्याकडे आहे असं ते म्हणाले. खाजगी रुग्णालयाकडून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची माहिती विलंबानं देण्याबाबत चौकशी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार बँकांना हमी देत असल्यानं खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं.

गलवान इथं झालेल्या हल्ल्यानंतर चीनी उत्पादनं वापरु नका असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.