नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना यावेळच्या ‘मन की बात’ साठी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा विषय लाखोंच्या संख्येने सुचवावा, असं आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांबरोबरच अगदी छोट्याशा गावातील स्तुत्य उपक्रमाची नोंद घेऊन त्याचाही उल्लेख ‘मन की बात’ मध्ये करतात पण देशाला भेडसावत असलेल्या मुख्य विषयांना मात्र जाणीवपूर्वक बगल देतात असा आरोप त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार महिन्यांपासून कच्च्या तेलाचे भाव नीचांकी पातळीवर आहेत मात्र मोदी सरकारनं याचा थेट फायदा जनतेला द्यायचं टाळत नफेखोरी करण्यावर भर दिला आहे असं जोशी यांनी सांगितलं. मोदी सरकार आणि मनमोहनसिंग सरकारच्या काळातल्या कच्च्या तेलाच्या किमतींची तुलना करता पेट्रोल-डिझेलच्या किमतीही खाली आणणं शक्य आहे असं ते म्हणाले.
इंधन दरवाढीनं गेल्या ७० वर्षातला उच्चांक गाठला असून दर कमी करुन सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्याकडे केली आहे.
तेल कंपन्यांनी दरवाढ केल्यानं डिझेल दरानं ८० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.सलग १९ दिवसांच्या दरवाढीनं या काळात डिझेलच्या दरात लिटर मागे १० रुपये ६३ पैसे वाढ झाली.
पेट्रोलच्या दरातही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे, सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा असेल तर दरात कपात करावी अशी मागणी सुळे यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला उद्देशून केलेल्या ट्विटमधे केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही ट्विटमधे उल्लेख केला आहे.