आर्थिक सुधारणांचा पाया घालण्यात राव यांनी घेतलेल्या अग्रणी भूमिकेचे उपराष्ट्रपतींकडून स्मरण

अलीकडील काळात वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचे श्रेय श्री राव यांना : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि भारतीय अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर असतानाच्या कठीण काळात आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी राव यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्मरण केले.

राव यांनी अर्थव्यवस्था मुक्त करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा दाखला देत, “परमिट राजने लादलेली बंधने खिळखिळी करुन, लाल फितीतून काहिसे मोकळे करत भारतीय उद्योगविश्वाला स्पर्धात्मक आयाम दिला”, असे नायडू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

माजी पंतप्रधानांनी मुक्त व्यापारव्यवस्थेचा पाया घातला तसेच त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरणाशी विशेषतः पूर्व आशियायी अर्थव्यवस्थेशी एकीकरण साधले असे नमूद करत उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे की “आधीच्या राजवटीतील  अंतर्मुख अर्थव्यवस्थेला जागतिक एकीकरणाचे नवीन आयाम देण्याच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा होता.”

 “ते सुधारणावादी होते आणि भारताने जगभरात घडणाऱ्या घटनांपासून बोध घेणे आवश्यक आहे असे त्यांना वाटत असे. संकटाचे संधीत रुपांतर करावे असे त्यांचे म्हणणे असे” असे नायडू यांनी म्हटले आहे.

काही वर्षे भारताचा जीडीपी सातत्याने वाढून नजीकच्या भूतकाळात देश अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला याचं मोठं श्रेय राव यांना जातं असंही उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

देशात सुधारणांना अनुकूल वातावरण तयार होऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुधारणांना गती दिली तर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुधारणा अधिक जोमाने राबवत आहेत.

देशाचे आण्विक शस्त्रसामर्थ्याची मुहूर्तमेढही राव यांनी घातली असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. परराष्ट्र धोरणातील त्यांच्या धाडसी निर्णयांमध्ये इस्त्रायलशी राजकीय संबध तयार करणे तसेच भारत आणि अमेरिकेला एकत्र आणून त्यांच्यांमधील कित्येक दशकांचा दूरावा मिटवणे यांचा समावेश होतो.

पंजाब आणि काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळींना आळा घालण्यातही माजी पंतप्रधान बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. ‘लूक इस्ट’ धोरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणारी 73 आणि 74 वी क्रांतीकारी घटनादुरुस्ती राव यांच्या कारकिर्दीत झाल्याचे नमूद करायलाच हवे, असेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.