नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं, की आणखी पाच महिने ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे.
कोविड-१९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर गरीबांना अन्नधान्य पुरवण्यासाठी सुरु केलेल्या या योजनेला आज दिलेल्या मुदतवाढीमुळे केंद्र सरकारवर ९० हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. कोरोनामुळे होणा-या मृत्यूचा दर पाहिला, तर इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे, असं ते म्हणाले.
लॉकडाऊनसारखे उपाय आणि निर्णय योग्यवेळी घेतल्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले. मात्र आता अनलॉक करताना लोक निष्काळजीपणे वागत आहेत, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं.
लॉकडाऊनच्या काळात नियमांचं काटेकोर पालन झालं, पण आता सरकार स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तशीच सावधगिरी दाखवली पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्रांवर विशेष भर देणं गरजेचं आहे. आरोग्यविषयक सूचनांचं पालन प्रत्येकानं केलं पाहिजे, एखाद्या गावाचा प्रमुख असो किंवा प्रधानमंत्री असो, नियमांच्या वर कुणीही नाही, असं ते म्हणाले.
कल्याणकारी योजना यशस्वी करण्यात शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. देश अनलॉकच्या दुस-या टप्प्यात प्रवेश करत असतानाच पावसामुळे खोकला, ताप, थंडीचा मोसमही सुरु होत आहे. त्यामुळे प्रत्येक देशवासियानं स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असं मोदी म्हणाले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या, प्रधानमंत्र्यांच्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती प्रधानमंत्र्यांना केली होती.
या योजनेत तांदूळ आणि हरभरा डाळ दिली जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतल्या सुमारे ७ कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.