नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-१९ वर उपाय ठरणाऱ्या लशीचं  संशोधन तसंच, त्यासंबंधी तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेता लसीकरण आणि इतर वैद्यकिय उपायांच्या व्यवस्थापना करिता देशातील विविध वैद्यकीय संघटनांमधे समन्वय असण्याची गरज आहे, असं मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.

या राष्ट्रीय प्रयत्नांमधे खासगी क्षेत्र तसंच नागरिक, समाज यांना ही आपली भूमिका बजावावी लागेल, असंही ते म्हणाले. त्यासाठी प्रधानमंत्र्यानी ४ मार्गदर्शक सिद्धांत नमूद केले. पहिल्या टप्यात कमकुवत समूहाचा शोध घेणं आणि सुरवातीच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावं लागेल, यात पहिल्या स्तरावर काम करत असलेले वैद्यकीय कार्यकर्ते तसंच आम जनता यांचा समावेश असेल.

दुसऱ्या मुद्दा लसीकरण कोणालाही उपलब्ध व्हावी हा असून तिसरा मुद्दा लस स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. उत्पादन सुरु झाल्यापासून लस दिली जाईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची निगराणी तसंच तंत्रज्ञानाचा कुशल वापर होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कालबद्ध पद्धतीनं लसीकरणचा राष्ट्रीय प्रयत्न शक्य व्हावा यासाठी तंत्रज्ञानाच्या पर्यायाचं मूल्यांकन करण्यांचे निर्देशही त्यांनी दिले. व्यापक लसीकरण मोहीमेसाठी तात्काळ; विस्तृत योजना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीत लस विकसित करण्यासंबंधीच्या प्रयत्नांवर व्यापक चर्चा  झाली.