मुंबई : आजच्या अस्थिर व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजार घसरलेला दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी ४ वाजता देशाला संबोधित केलेल्या भाषणामुळे व्यापाराच्या वेळात अस्थिरता आणखी वाढली. देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गरीब कल्याण अन्न योजनेत नोव्हेंबर २०२० च्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. या योजनेमुळे ८ दशलक्ष भारतीय गरीब कुटुंबांना मोफत रेशन उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे तिजोरीवर अतिरिक्त ९०,००० कोटी रुपयांचा भार वाढेल.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात निफ्टी ०.१० % किंवा १०.३० अंकांनी घसरून १०,३०२.१० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.१३% किंवा ४५.७२ अंकांनी घसरून ३४,९१५.८० अंकांवर स्थिरावला. जवळपास १४५२ शेअर्स घसरले. १२५९ शेअर्सनी नफा कमावला तर १३७ शेअर्स स्थिर राहिले.

श्री सिमेंट्स (३.१२%), मारुती सुझुकी (२.६६%), नेस्ले (२.५४%), आयसीआयसीआय बँक (२.५९%) आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.४१%) हे निफ्टीवरील टॉप गेनर्समध्ये समाविष्ट होते. तर बीपीसीएल (२.५०%), आयओसी (१.७२%), पॉवर ग्रिड (१.९४%), सन फार्मा (१.८९%) आणि युपीएल (१.१८%)हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप हे अनुक्रमे ०.१४% आणि ०.७५% नी घसरले.

पंजाब अँड सिंध बँक: पंजाब अँड सिंध बँकेने चौथ्या तिमाहीत २३६.३० कोटी रुपयांचा व्यापक तोटा जाहीर केल्यानंतर कंपनीचे शेअर्स ४.९१% नी घसरले. त्यांनी १५.५० रुपयांवर व्यापार केला.

एमआरएफ: एमआरएफने चौथ्या तिमाहीत ६७९.०२ कोटी रुपयांचा एकत्रित नफा दुपटीने वाढल्याचे नोंदवले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स २.९२ % नी वाढून त्यांनी ६७,१०० रुपयांवर व्यापार केला.

फोर्स मोटर्स: कंपनीचा चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा ८३.४% घसरला. तर महसूल ३८.४% नी खाली आला. तरीही कंपनीचे स्टॉक्स १.१४% नी वाढून त्यांनी ९३५.०० रुपयांवर व्यापार केला.

हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट: एचयूडीसीओ कंपनीने चौथ्या तिमाहीत ८६.६% एकत्रित नफ्यात वाढ दर्शवल्यानंतर कंपनीचे शेअर्स ४.३३% नी वाढले व त्यांनी ३४.९० रुपयांवर व्यापार केला.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने चौथ्या तिमाहीत १५२९.०७ कोटी रुपयांचे नुकसान दर्शवले. त्यानंतर बँकेचे शेअर्स १०.६२% नी घसरून त्यांनी १८.१० रुपयांवर व्यापार केला.