मुंबई : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून तीन हेलिकॉप्टर व ड्रोन तैनात करण्यात आले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक तथा विधानसभा निवडणुकीसाठीचे सुरक्षा विषयक नोडल अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिली.
मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडावी, यासाठी राज्य पोलीस दलातील 2 लाख पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, नागालँडचे महिला पोलीस दल आदी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 350 कंपन्या (प्रत्येक कंपनीत शंभर अधिकारी/जवानांचा समावेश), राज्य राखीव पोलीस दलाच्या 100 कंपन्या, राज्य गृहरक्षक दलाचे 45 हजार जवान अहोरात्र तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच इतर राज्यातील सुमारे 20 हजार गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे.