मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्याहून पंढरपूरकडे काल विठूरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद़गुरू तुकोबाराय यांच्यासह चारही संतांच्या पादुका आज पंढरीच्या विठूरायाचं आणि रुक्मिणीमातेचं दर्शन घेऊन सायंकाळी परत फिरत आहेत.

या पादुका रात्री उशिरापर्यंत आळंदी आणि देहू येथे पोहचतील.तत्पूर्वी देशावर आणि राज्यावरील कोरोनाचे संकट दूर करुन, पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आनंदी आरोग्यदायी जीवन जगण्याची संधी दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पांडुरंगाला केली.

आषाढी एकादशी निमित्तानं आज श्री क्षेत्र पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे साडे तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यंदा आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बडे यांना देण्यात आला.