नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे या कार्यकारिणीत नसून त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. मात्र त्या राज्यातील कोअर कमिटीच्या सदस्यही असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पंकजा मुंडे यांना कार्यकारणीत स्थान मिळालं नसलं तरी त्यांच्या बहिण प्रितम मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी दिली आहे, असं ते म्हणाले. या कार्यकारिणीत १२ प्रदेश उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस,१ महामंत्री संघटन, १ कोषाध्यक्ष, १२ सचिव, ७ मोर्चांचे अध्यक्ष आणि ७९ कार्यकारी सदस्य असल्याचं त्यांनी सांगितलं.