मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेनं काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून या ठिकाणी रेड अलर्ट असेल. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहनही करण्यात आलं आहे.

मुंबईत आज दिवसभर मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अंधेरीत रस्त्यावर पडलेल्या झाडांची महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने छाटणी करत रस्ता मोकळा केला.

काल पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्गला झोडपून काढलं आहे. आज सकाळी ८ वाजता नोंद झाल्याप्रमाणे गेल्या २४ तासात जिल्ह्यात १२१.६ च्या सरासरीने एकूण ९७२.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात १९७ मिमी पडला. पावसामुळे मध्यंतरी खोळंबल्या शेतीच्या कामना वेग आला आहे. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून मिळालेल्या माहितीनुसार कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वेंगुर्ले तालुक्यात  पडझडीच्या घटना घडल्या आहेत. कुडाळ तालुक्यात हातेरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तसच कुडाळ तालुक्यात  माणगाव इथं आंबेरी पुलावर पाणी आल्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. तसंच कणकवली तालुक्यात पिसेकामते आणि  बिडवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात नदीला पुराच पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात नदी काठच्या नागरीकांनी सर्तक रहावं, अस आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आल आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावली असून खामगाव, शेगावसह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं नदी-ओढे यांना पूर आला आहे. खामगाव तालुक्यात घारोड, बोरीअडगाव, लोखंडा या गावांमध्ये नद्यांना पूर आला असून शेतकरी मात्र या पावसामुळे समाधान व्यक्त करत आहेत.

वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी आणि ओढ्यांना पूर आल्यानं रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

परभणीच्या मानवत शहरातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं.